‘राष्ट्रवादी काँग्रेस आता मोठा भाऊ तर काँग्रेस लहान भाऊ’
राष्ट्रवादीचा काँग्रेसला सुचक इशारा, जागा वाटपावरुन मविआत बिनसणार?,२०१४ ची पुनरावृत्ती होणार?
कोल्हापूर दि २१(प्रतिनिधी)- आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे.पहिल्या टप्प्यात जागा वाटपची चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला टोला लगावला आहे. त्यामुळे आघाडीत जागा वाटपावरुन वाद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमुठ सैल होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच पवार यांनी नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
कोल्हापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी मजबूत ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. ताकद जास्त असेल तर आघाडीत महत्व टिकेल. याआधी काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या. त्यामुळे वाटाघाटी करताना राष्ट्रवादी काँग्रेसला लहान भावाची भूमिका घ्यावी लागायची. आता परिस्थिती वेगळी आहे. राज्यात सध्या काँग्रेसच्या ४४ जागा आहेत तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. त्यामुळे आता आम्ही मोठे भाऊ आहोत, असे पवार म्हणाले आहेत. विशेष म्हणजे लहान भाऊ मोठा भाऊ असा वाद २०१४ साली शिवसेना भाजपात रंगला होता. त्यावेळी भाजपाने आपली ताकत वाढल्याचे सांगत आपण मोठे भाऊ आहोत अशी भुमिका घेतली होती. त्यामुळे तब्बल २५ वर्ष जुनी युती तुटली होती. त्यामुळे तसाच वाद आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये होत आहे. जागा वाटप गुणवत्तेच्या आधारावर होईल. यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्व जागा गुणवत्तेच्या आधारावर ठरविल्या जातील. तशीच चर्चा होईल, असे पटोले म्हणाले होते. त्याला अजित पवार यांनी ताकतीचा दाखला देत टोला लगावला आहे.
या वादावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “सगळ्यांची डीएनए टेस्ट करू आम्ही एकदा. हा विनोद समजून घ्या. लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय मधल्या काळात शिवसेना-भाजपा युतीमध्ये सुद्धा आला होता. तेव्हाही मी म्हणालो होतो की, डीएनए टेस्ट करावी लागेल असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.