राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची एसटी चालकाला मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, या कारणामुळे झाली मारहाण
हिंगोली दि १०(प्रतिनिधी)- हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने बस चालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. किरकोळ कारणात थेट हाणामारी केल्याने संताप व्यक्त होत आहे.
हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरकडाजवळ एसटी महामंडळाच्या चालकाला बस का थांबवली नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली आहे. स्वत:च्या मुलाला शाळेत जाण्यासाठी बस का थांबवली नाही, या कारणावरून ही मारहाण होत असताना कोणीतरी याचा व्हिडिओ काढला आहे. मारहाण करताना आजूबाजूला अनेक लोक जमा झाले होते. याप्रकरणी एसटी महामंडळाचे चालक बाबुराव मोरे यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी राष्ट्रवादीचा पदाधिकारी विजय गावंडे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वतःच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी बस का थांबवली नाही अशी विचारणा केल्यावर एसटी चालकाने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याशी युक्तिवाद केला पण पदाधिकाऱ्याने थेट मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.