
उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.मध्य प्रदेशातील रहिवासी असलेली ही विद्यार्थिनी महोबा शहरात राहून नीट (NEET) परीक्षेची तयारी करत होती. गेल्या 30 एप्रिल रोजी कोचिंग क्लासवरून घरी परतत असताना कारमधून आलेल्या काही गुंडांनी तिचे अपहरण केले होते. या घटनेनंतर तब्बल 16 दिवसांनी पोलिसांनी या विद्यार्थिनीचा शोध घेतला असून तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अर्धा डझन आरोपींच्या मदतीने कोंडून ठेवले
पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितलेली आपबीती अत्यंत अंगावर काटा आणणारी आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिच्याच गावातील मोहित श्रीवास याने अंकित श्रीवास आणि हल्लू राजपूत यांच्यासह सुमारे अर्धा डझन आरोपींच्या मदतीने तिला प्रयागराज येथे कोंडून ठेवले होते. या दरम्यान तिला दर दोन तासांनी नशा देणारे इंजेक्शन दिले जात होते आणि मोहितने तिच्यावर बलात्कार केला. या कृत्याला विरोध केला असता नराधमांनी तिला सिगरेटचे चटके दिले आणि चाकूने वार केले, तसेच तिच्या भावाचा फोटो दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मोहितने तिच्याशी जबरदस्तीने लग्नही केले. आता ही पीडिता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची आणि दोषींना फाशी देण्याची मागणी करत आहे.

सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक
या भीषण घटने समोर आल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून यावरून आता राजकारणही तापले आहे. काँग्रेस पक्षाने या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले असून काँग्रेसचे प्रदेश सचिव ब्रजराज सिंह यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांच्या सूचनेनुसार पक्ष या घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी पीडितेशी फोनवर संवाद साधला असून ब्रजराज सिंह यांनी आरोपींवर तातडीने कडक कारवाई करण्याची आणि पीडितेवर चांगल्या उपचारांची मागणी केली आहे. तसेच काँग्रेसचे एक प्रांतीय शिष्टमंडळ लवकरच पीडितेची भेट घेण्यासाठी महोबा येथे पोहोचणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत अप्पर पोलीस अधीक्षक वंदना सिंह यांनी माहिती दिली की, 1 मे 2026 रोजी एका महिलेने कोतवाली नगर महोबा येथे आपली 25 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देऊन काही नामजद आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून चार पथके तयार करण्यात आली होती आणि पथकांच्या प्रयत्नांमुळे 16 मे रोजी तरुणीला सुखरूप शोधून तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आतापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असून त्यांना लवकरच न्यायालयात हजर केले जाईल, तसेच उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी एसओजी आणि सर्व्हिलन्सच्या मदतीने चार पथके काम करत असून लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल.

