‘पुढच्या वेळी १५ ऑगस्टला मीच देशाला संबोधित करणार’
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास, लाल किल्ल्यावरून फुंकले निवडणुकीचे रणशिंग, इंडीयाला आघाडीला टोला
दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले.यावेळी त्यांनी देशाला तीन गोष्टीविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात मला तुमच्या आशिर्वादाची गरज आहे. त्याचबरोबर पुढच्या वर्षीही मीच देशाला संबोधित करेन असे म्हणत स्वातंत्र्यदिनी निवडणुकीचेही रंग दाखवले. मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला. यावेळी तिरंग्याला २१ तोफांची सलामी देण्यात आली.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत,मणिपूर, शेतकरी, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. भ्रष्टाचार, परिवारवाद, आणि तुष्टीकरण याविरोधात लढा देण्याचा निर्धार मोदींनी व्यक्त केला आहे. तसेच मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार असे मोदी या वेळी म्हणाले आहेत. येणाऱ्या २०४७ मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करेल, त्या वेळी जगात भारताचा तिरंगा ध्वज विकसित भारताचा तिरंगा ध्वज असावा. असा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल मोठे भाष्य केले आहे. ते म्हणाले “पुढील पाच वर्षात देश पहिल्या तीन जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये असेल, ही मोदीची ग्यारंटी आहे.” असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पुढच्या वेळी १५ ऑगस्टला या लाल किल्ल्यावरून मी तुमच्यासमोर देशाचे यश आणि विकास मांडणार आहे. येत्या १५ ऑगस्टला पुन्हा येईल. मी फक्त तुमच्यासाठी जगतो. कारण तुम्ही माझे कुटुंब आहात, असे म्हणत मी पुन्हा येईन असा नारा दिला. तसेच भारताचा विकासाचा आढावा घेताना त्यांनी मागील ९ वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला आहे. तसेच अनेकांना गरिबीमधून बाहेर काढलं आहे. महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा सलग १०व्यांदा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करत जनतेला संबोधित करण्याचा विक्रम केला आहे.
मणिपूर मधील स्थितीबाबत बोलत असताना मागील काही दिवसांपासून मणिपूर मध्ये स्थिती सुधारत असल्याचं ते म्हणाले आहेत. हिंसाचारामध्ये अनेकांनी जीव गमावले आहेत. पण आता तिथे शांतता प्रस्थापित होत आहे. मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.