आगामी विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा बार्शीतील उमेदवार ठरला
शरद पवार यांनी केली घोषणा, बार्शीतील राष्ट्रवादी शरद पवारांसोबत, बार्शीत रंगणार बहुरंगी लढत
बार्शी दि १५(प्रतिनिधी)- राज्यातील राजकारण कमालीचे अस्थिर झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुक कमालीची चुरशीची होणार आहे. पण शरद पवार यांनी आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी सोलापूर दाैऱ्यात पंढरपूर नंतर आता विधानसभेसाठी बार्शीतील उमेदवाराची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात बार्शीत बहुरंगी लढत पहायला मिळणार आहे.
बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. विश्वास बारबोले, मकरंद निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळासोबत पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूकीविषयी चर्चा केली. त्यावेळी “बार्शीत तुम्ही लढा, तुम्ही कोणतीही काळजी करू नका. माझी संपूर्ण ताकद तुमच्या पाठीशी असेल, असा शब्द दिला.त्यामुळे विश्वास बारबोले हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार असे बोलले जात आहे. अजित पवार हे भाजपसोबत जाऊन युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे बार्शी शहर आणि तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी कोणाकडे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आता विश्वास बारबोले आणि मकरंद निंबाळकर यांनी पदाधिकाऱ्यांसह बारामती येथे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट यावर पडदा टाकला आहे. बार्शीत पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्रीत निवडणुका झालेल्या आहेत विद्यमान आमदार राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यात कायम सामना राहिलेला आहे. पण शिवसेनेतील फुटीनंतर सोपल यांनी कोणतीही भूमिका घेतलेली दिसत नाही. पण ते लवकरच कार्यरत होतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तर राऊत भाजपाकडुन निवडणूक लढवणार आहेत. तर शिंदे गटाकडुन भाऊसाहेब आंधळकर निवडणुक खेचण्यासाठी उत्सुक आहेत. त्यातच संभाजी महाराजांच्या स्वराज्य पक्षाकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बार्शीत बहुरंगी लढत होणार आहे.
दरम्यान वैराग भागातील नागरिक व पदाधिकाऱ्यांची साथ शरद पवार यांनाच असल्याचे वैरागचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मकरंद निंबाळकर यांनी या वेळी सांगितले. माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांनी बार्शी शहरातील राजकीय परिस्थिती पवार यांच्यासमोर मांडली आहे. पण स्थानिक निवडणुकीवरून देखील बार्शीतील जनता कोणाला साथ देणार याचा उलगडा करता येणार आहे.