Latest Marathi News
Ganesh J GIF

निर्सगाला शब्दात गुंफणारे कवी ना.धो महानोर यांचे निधन

रानकवी काळाच्या पडद्याआड, साहित्यविश्वावर शोककळा, आमदार असताना उल्लेखनीय कार्य

पुणे दि ३(प्रतिनिधी)- ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी ना. धो. महानोर यांचे निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी साहित्य कलाविश्वावर हा सलग दुसरा आघात आहे. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मराठी काव्य क्षेत्रात आपल्या शब्दकळांनी रान गंध पसरविणारे व मराठी माणसांच्या मनात स्थान निर्माण करणारे कवी अशी त्यांची ओळख होती. मराठी साहित्य क्षेत्रात आपल्या गावरान साहित्याच्या जोरावर महानोर यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना मानाच्या साहित्य अकादमी ते पद्मश्री पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. पुण्यातील रुबी रुग्णालयात गेल्या १२ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. . धों. महानोर यांनीच महाराष्ट्राला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे लोकप्रिय घोषवाक्य दिले होते. त्यांनी लिहिलेले ‘सुलोचनाच्या पाऊलखुणा’ हे त्यांचे पुस्तक शेवटचे ठरले होते. त्यांच्या लेखनीतूनच ‘अजिंठा’, ‘कापूस खोडवा’, ‘पानझड’, ‘पावसाळी कविता’, ‘पळसखेडची गाणी’, ‘पक्षांचे लक्ष थवे’, ‘रानातल्या कविता’, ‘शेती’, ‘गंगा वाहू दे निर्मळ’, ‘त्या आठवणींचा झोका’, ‘दिवेलागणीची वेळ’ असे दर्जेदार साहित्य साकारले. ‘शेतीसाठी पाणी’, ‘जलसंधारण’, ‘फलोत्पादन’, ‘ठिबक सिंचन’, ‘शेतकरी दिंडी’ ही पुस्तके साकारली.’ सुलोचनाच्या पाऊलखुणा’ हे त्यांचे पुस्तक शेवटचे ठरले. महानोर विधानपरिषदेचे माजी आमदार होते. विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीच्या आणि अभ्यासाचा विषय असलेल्या शेतीवर प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कमी पाण्यावर पिके घेता येतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. राज्य सरकारने त्यांच्या या प्रयोगाची दखल घेत कोरडवाहू फळझाड योजना सुरू केली होती. दूरच्या रानात केळीच्या बनात ही कविता आजही लोकप्रिय आहे. या कवितेतील प्रत्येक शब्द निसर्गातील निर्मितीला साद घालणारा होता. त्यांच्या निधनानंतर शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी आदरांजली वाहिली आहे.

काल रात्री ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्यांचे चिरंजीव यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अशोक जैन यांच्याशी सल्लामसलत केली आणि संध्याकाळी त्यांच्यावरील उपचार थांबवण्यात आले. कालच नितिन देसाई यांनी आत्महत्या केली होती. तर आज महानोर यांच्या निधनाने दुसरा धक्का बसला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!