
पुणेकरांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहरातील वाढत्या राजकीय आणि सामाजिक हालचालींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात आज रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी ‘जमावबंदीचे आदेश’ लागू करण्यात आले आहेत.

या काळात शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, मिरवणुका आणि सभा घेण्यास पोलिसांनी पूर्णपणे बंदी घातली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असतानाच, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी हे मोठे पाऊल उचलले आहे.

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; ‘या’ कलमान्वये आदेश जारी

सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. आगामी बकरी ईद तसेच इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आदेशात नेमके काय म्हटले आहे? ‘या’ गोष्टींवर असेल पूर्ण बंदी
पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, पुढील १४ दिवस खालील बाबींवर कडक कायदेशीर निर्बंध असणार आहेत
1.पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे, सार्वजनिक ठिकाणी सभा घेणे, मोर्चे किंवा मिरवणुका काढणे यावर पूर्णपणे बंदी असेल.
2. तलवार, भाला, लाठी, काठी, बंदूक किंवा शारीरिक इजा करू शकेल अशी कोणतीही वस्तू सार्वजनिक ठिकाणी सोबत बाळगण्यास सक्त मनाई आहे.
3.दगड गोळा करणे, क्षेपणास्त्रे किंवा अस्त्रे तयार करणे, तसेच कोणतेही दाहक, स्फोटक आणि ज्वलनशील द्रव पदार्थ सोबत नेण्यावर निर्बंध असतील.
4.सार्वजनिक शांतता भंग करू शकतील अशा अर्वाच्च घोषणा देणे, चिथावणीखोर गाणी किंवा वाद्ये वाजवणे यावर बंदी असेल. तसेच कोणत्याही नेत्याच्या किंवा व्यक्तीच्या चित्राचे/प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यास मनाई आहे.
5.शिष्टाचाराच्या आणि नैतिकतेच्या विरोधात असणारे चित्रे, चिन्हे, किंवा फलक वापरल्यास कडक कारवाई केली जाईल.
नियम तोडल्यास थेट गुन्हा आणि कारवाई!
पुणे पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. जर एखाद्या व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केले, किंवा शस्त्र आणि धोकादायक वस्तू बाळगल्या, तर पोलीस त्या वस्तू जप्त करतील. तसेच संबंधित व्यक्तीवर तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हे देखील वाचा: (https://maharashtrakhabar.com/fight-against-closed-contact-husband-causes-life-threatening-situation-for-wife-in-nagpur-that-knock-on-the-door-saved-her-life/)

