शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह काही कौटुंबिक विषयांमुळे चर्चेत आहेत. सासू-सासऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. शहीद कॅप्टन अंशुमन सिंह मरणोपरांत किर्ती चक्रने सन्मानित करण्यात आलं.हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर सासू-सासऱ्यांनी केलेल्या आरोपांमुळे स्मृती सिंह चर्चेत आल्या. आता स्मृती सिंह यांच्याबद्दल एका युजरने ऑनलाइन अश्लील कमेंट केली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी कारवाईसाठी पावलं उचलली आहेत. स्मृती सिंह यांच्याबद्दल अत्यंत अयोग्य आणि अपमानास्पद कमेंट करण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पत्राला दिल्ली पोलिसांनी प्रतिसाद दिला. NCW ने आरोपीला अटक करण्याची सूचना करताना तीन दिवसात अहवाल सादर करायला सांगितला आहे.
या प्रकरणात NCW ने पोलिसात तक्रार नोंदवली. सोशल मीडिया युजरने स्मृती सिंह यांच्या फोटोवर अत्यंत घाणेरडी, अनादर करणारी कमेंट केली होती. राष्ट्रीय महिला आयोगाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत तपास सुरु केलाय. कॅप्टन अंशुमन सिंह भारतीय सैन्यात वैद्यकीय अधिकारी होते. 26 पंजाबसह ते सियाचीन ग्लेशियर भागात तैनात होते.19 जुलै रोजी 2023 रोजी भारतीय सैन्याच्या शस्त्रास्र डेपोला आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहिल्यानंतर कॅप्टन सिंह यांनी आतमध्ये अडकलेल्या चार ते पाच जणांना बाहेर काढण्यासाठी लगेच हालचाल सुरु केली. आग वैद्यकीय तपास खोलीपर्यंत पोहोचली होती. त्या स्थितीत सुद्धा कॅप्टन अंशुमन यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता वैद्यकीय बॉक्स आणण्यासाठी आत शिरले. पण आगीच्या ज्वाळा आणि सोसाट्याचा वारा यामध्ये होरपळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं शौर्य आणि बलिदान लक्षात घेऊन त्यांना मरणोपरांत किर्ती चक्रने सन्मानित करण्यात आलं.