
मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत संबंधित अधिकाऱ्याला अटक केली असून, त्याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी एका सार्वजनिक बागेत खेळत होती. यावेळी आरोपीने संधी साधून मुलीशी गैरवर्तन आणि अश्लील चाळे केले. या प्रकारामुळे घाबरलेली मुलगी तात्काळ घरी गेली आणि तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.

मुलीने दिलेल्या माहितीनंतर, तिच्या पालकांनी विलंब न करता जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीची ओळख पटवली आणि त्याला बेड्या ठोकल्या.अटक करण्यात आलेला आरोपी हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असून तो पोलीस महासंचालक कार्यालयातील कम्युनिकेशन आणि आयटी विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीविरोधात पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.

