सांगोला दि १८ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. यावेळी काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटिल.. एकदम ओक्के.. या डायलाॅगमुळे फेमस झालेले आमदार शहाजी बापू पाटील यांचा त्यांच्याच मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे सांगोल्यात राजकीय धुरळा उडणार आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पक्षात प्रवेश देत उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यातच शहाजीबापू पाटील यांना पर्याय उभा केला आहे. येत्या रविवारी सांगोल्यात खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत लक्ष्मण हाके यांनी शिवसैनिकांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे. या निमित्ताने शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे. यामाध्यमातून लक्ष्मण हाके देखील.आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे योग्य निर्णय घेतील. मात्र एक शिवसैनिक म्हणून सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीवर आम्ही शिवसैनिक मोठ्या ताकदीने उभा करू असा विश्वास हाके यांनी व्यक्त केला आहे. तर शहाजीबापू पाटील यांनी हाकेंना कोण ओळखतो अस म्हणत सांगोल्याची जनता आपल्यालाच साथ देणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे सांगोला कोणाला ओक्के म्हणणार आणि कोणाचा कार्यक्रम करणार यावर दावे प्रतिदावे केले जाणार आहेत.
शहाजीबापू पाटील यांनी गणपत देशमुख यांच्याशिवाय झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. पण त्यांनीही एकनाथ शिंदेना साथ देत गुवाहाटी गाठली होती. त्यावेळेस अनोख्या डायलाॅगबाजीमुळे ते प्रसिद्ध झाले होते.पण आता मात्र त्यांच्याच ओक्के कार्यक्रम करण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे.