
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. महाराष्ट्रात तर या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. या निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघांची विशेष रुपाने चर्चा होत आहे. यामध्येबरामती या मतदारसंघाचाही समावेश आहे. कारण या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना होणार आहे. मात्र एकनाथ शिंदे गटातील विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढील अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. असे असतानाच शिवतारे यांनी उमेदवारी अर्ज भरून बारा वाजवणार आहे, असं शिवतारे म्हणालेत. त्यांच्या या घोषणेमुळे अजित पवारांच्या अडचणी वाढणार आहे.
विजय शिवतारे यांनी 24 मार्च रोजी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. महायुतीमध्ये बारामती हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता आहे. या जागेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना तिकीट देण्यात आले आहे. याच कारणामुळे या जागेवर नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी बाजूने जोमात तयार केली जात आहे. असे असतानाच शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते विजय शिवतारे हे मात्र बारामती या जागेवरून लढण्यावर ठाम आहेत. काहीही झालं तर मी निवडणूक लढवणार आहे, असं ते म्हणालेत.
माझ्याकडे मोठा पक्ष नाही, माझ्याकडे लोक नाहीत. माझ्याकडे फक्त सामान्य जनता आहे. याच जनतेला आवाहन करून प्रभावशाली सभा घेणार आहे. या सभांच्या माध्यमातून मी स्थानिक प्रश्नांवर मी बोलणार आहे.लोकांमध्ये जनजागृती करणार आहे. 12 तारखेला 12 वाजता मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या पाशवी शक्तींचे मी 12 वाजवणार आहे.
मी अर्ज दाखल केल्यानंतर पुढे मला निवडणूक चिन्ह मिळेल. हे चिन्ह सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही यंत्रणा राबवणार आहोत. आम्ही एवढ्या मोठ्या मतदारसंघात मी रोड शो करून जनतेचा दर्शन घेणार आहे, असे शिवतारे यांनी सांगितले. राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोसला आहे. यांनी सर्व यंत्रणांवर कब्जा केलेला आहे, असा गंभीर आरोप शिवतारे यांनी केला.