मुंब्रात ऑनलाइन गेमद्वारे ४०० जणांच्या धर्मांतराचा दावा?
‘केरला स्टोरी’प्रमाणे मुंब्रा स्टोरीही बोगस असल्याचा काँग्रेसचा दावा, सरकारला दिले आव्हान
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर प्रकरणाचे धागेसोरे ठाण्यातील मुंब्रा पर्यंत पोहचले होते. या प्रकरणातील आरोपी शहानवाजला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. अलिबागच्या एका लॉजमधून शहानवाजला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मुब्रात देखील धर्मपरिवर्तन झाल्याचा दावा करण्यात आला होता.
या प्रकरणी काँग्रेस नेते नसीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले , मुंब्र्यात ४०० लोकांचे धर्मांतरण केल्याचा दावा केला जात आहे पण त्यात तथ्य नाही. उत्तर प्रदेशातील गाजियाबाद पोलीसांनी फोनवरील संभाषणावरून येथे येऊन एकाला अटक करून धर्मांतरणाच्या मुद्द्याला प्रसिद्धी देण्याचे काम केले. ४०० लोकांच्या धर्मांतरण झाले असेल तर सरकराने त्या लोकांची यादी जाहीर करावी आव्हान नसीम खान यांनी दिले आहे. केरला स्टोरीमध्ये चित्रपटात ३० हजार महिलांचे धर्मांतरण करुन आयसीस मध्ये भरती करण्यात आल्याचा खोटा दावा करण्यात आला होता. हा चित्रपट कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीवेळी प्रदर्शीत केला. या चित्रपटाचे प्रमोशन स्वतः पंतप्रधान मोदींनी केले. पण केरला स्टोरीचे प्रकरण हाय कोर्टात गेल्यावर चित्रपट निर्मात्यांनेच हा चित्रपट खऱ्या घटनेवर नाही तर काल्पनिक आहे हे स्पष्ट केले. कर्नाटकात केरला स्टोरीच्या माध्यमातून हिंदू मुस्लीम वाद निर्माण करुन त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला कर्नाटकच्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. केरला स्टोरी ही बोगस होती तशीच मुंब्रा स्टोरीही बोगस आहे, असे नसीम खान म्हणाले आहेत.
गुजरातहून आलेल्या एका फोन कॉलमध्ये मुंब्रा भागात तब्बल ४०० जणांचं धर्मांतर झाल्याचा उल्लेख असल्याने पोलीसही सतर्क झाले आहेत .आतापर्यंत पाच अल्पवयीन मुलांनी मुस्लीम धर्मांतर केल्याची उदाहरणं आहेत. याप्रकरणी एका मौलवीला अटक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी शहनवाज पोलिसांच्या हाती लागला आहे. तपासाअंती सर्व खुलासा होणार आहे.