‘नाहीतर तुम्हाला अपात्र करेन’, मंत्री केसरकरांनी तरुणीला भरला दम
शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल, शिंदे सरकारवर जोरदार टिका, केसरकर का संतापले?
बीड दि २७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शिंदे सरकारवर अनेकवेळा आपल्याच मंत्री आणि आमदारांमुळे टीकेची झळ सोसावी लागत आहेत. खासकरून शिंदे गटातील मंत्री आणि आमदार यात आघाडीवर आहेत. आता पुन्हा एकदा शिंदे सरकारवर जोरदार टिका होत आहे. यावेळेस या टीकेला राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर कारणीभूत ठरले आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर रविवारी बीड दौऱ्यावर होते. त्यावेळी केसरकर माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना शिक्षक भरतीची तयारी करणारी एका तरुणीने थेट केसरकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे केसरकर चांगलेच संतापले होते. अद्यापही राज्यात शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे राज्यातील भावी शिक्षक पाण्यात देव बुडवून बसले आहेत.त्यामुळे एका भावी शिक्षिकेने केसरकर यांना शिक्षक भरतीची वाट पाहून आम्ही खूप थकलो आहोत. संकेतस्थळ सुरू आहे, नोंदणी सुरू आहे, पण पुढे प्रक्रिया होतच नाही. जाहीरातच आली नाही, तर चॉइस कसा देणार? जाहीरात कधीपर्यंत येणार? आम्ही पाच वर्षापासून जाहिरातीची वाट पाहतोय, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. पण यामुळे केसरकर चांगलेच संतापले. तुम्हाला अजिबात कळत नाही, तुम्ही शिक्षक होऊ शकता का? तुमची साईट ओपन झाली आहे. तुम्ही संकतेस्थळाला भेट दिली पाहिजे. तिथे तुम्ही तुमची निवड नोंदवले पाहिजे. जाहिरात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला जाहिरात द्यायला सांगितलेली आहे असे केसरकर म्हणाले. त्याचबरोबर राज्यातील विद्यार्थी हे महाराष्ट्राचं भवितव्य आहे. ती मुलं चांगली शिकली, तर महाराष्ट्र घडणार आहे. अजिबात मध्ये बोलायचं नाही, अन्यथा तुमचं नाव घेऊन अपात्र करायला लावेल,’ अशी तंबीही त्यांनी दिली. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. केसरकर यांच्या वक्तव्यामुळे चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान शिक्षण खात्याने आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय २१ नोव्हेंबर रोजी घेतला. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
“महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला ‘डिसक्वालिफाय’ करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून ‘या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?’ असा प्रश्न पडतो” अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी केसरकर यांच्यावर जोरदार टिका केली आहे.