
भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून टोळक्याने केले तरुणावर कोयत्याने वार; येरवड्यातील गांधीनगरमधील घटना
पुणे- पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यातच पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे यामध्ये भांडणात मध्यस्थी करुन ती सोडविल्याने टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जबर जखमी केल्याचा प्रकार येरवड्यात घडला आहे.
याबाबत अभिजित अप्पासाहेब दुशींग (वय ४०, रा. गांधीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रतिक नाईकनवरे, चिकू नाईकनवरे, अभिषेक बडे, श्री पाटोळे, प्रियांशू वैरागर (सर्व रा. गांधीनगर, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरात राहतात. प्रतिक नाईकनवरे याची सागर हुले याच्यासोबत भांडणे झाली होती. ती फिर्यादी यांनी मध्यस्थी करुन सोडवली होती व प्रतिक याच्या कानाखाली मारली होती. त्याचा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादी यांच्या मुलास रविवारी काही कारण नसताना कानाखाली मारली. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी हे गेले होते. त्यावेळी मागील वेळच्या भांडणाचा राग मनात धरुन त्याने कोयत्याने फिर्यादीला मारहाण केली. मार वाचविण्यासाठी फिर्यादी हे पळून जाऊ लागले. तेव्हा टोळक्याने त्यांचा पाठलाग करत मोठ मोठ्यांनी आरडाओरडा करुन परिसरात दहशत पसरवली. कोयता उगारुन मध्ये “कोणी आला तर त्याला सोडणार नाही,” अशी धमकी दिली. त्यामुळे लोकांनी आपल्या घराचे दरवाजे बंद केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे अधिक तपास करीत आहेत.