Latest Marathi News
Ganesh J GIF

मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यातील पीएमटी सुरळीत करा

खासदार सुप्रिया सुळे यांची पीएमपीएमएलकडे पत्राद्वारे मागणी, त्या निर्णयावर विचार करण्याची मागणी

पुणे दि ५(प्रतिनिधी)- मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची सेवा बंद करून सर्व गाड्या कोथरूड डेपोमधून सोडण्यात येत आहेत. तसे करण्याने मार्केट यार्डात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह अन्य सर्वच प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या गाड्या मुळशी तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतून थेट मार्केट यार्डपर्यंत धावत होत्या. थेट सेवा असल्याने कित्येक शेतकरी आपला शेतमाल या गाड्यांतून मार्केट यार्डात आणत होते. शिवाय काही किरकोळ व्यापारी मार्केट यार्डातून पिरंगुट, भुकुम, भुगाव, पौड, मुळशी आदी भागात भाजीपाला नेऊन विक्री करत होते. याबरोबरच शहरातील महत्वाच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या या गाड्यांमधून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच आरोग्य सेवा तसेच अन्य कामांसाठी प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना या थेट गाड्यांचा फायदा होत होता.

अचानक या सर्व गाड्या बंद करून कोथरूड पर्यंतच प्रवास थांबवण्यात आल्याने या सर्व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून दोन दोन गाड्या बदलून इच्छित स्थळी जाणे अडचणीचे ठरत आहे. त्याशिवाय तिकीट दराचाही बोजा वाढला आहे. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल आणि भाजीपाला दोन वेगळ्या गाड्यांत उतर-चढ करणे जिकिरीचे जात आहे. याशिवाय वेळेवर पुढील गाड्या मिळणे, तेथील गर्दी या सर्वच गिष्टींमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे, तरी या बस गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.

पीएमपीएमएल ला याबाबत त्यांनी पत्र दिले असून तसे ट्विटही केले आहे. मुळशी तालुक्यात जाणाऱ्या सर्व बसगाड्या पीएमपीएमएलने बंद केल्याबाबतचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. प्रवाशांची गैरसोय होत असल्याचेही या वृत्तांत नमूद केले आहे. याशिवाय अनेक प्रवाशांनी तशा तक्रारी सुद्धा केल्या आहेत. पीएमपीएमएलने याची दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!