राष्ट्रवादी नाही तर पंकजा मुंडे ‘या’ पक्षात प्रवेश करणार?
पंकजा मुंडे यांच्या भाजपबद्दलच्या 'त्या' विधानाची जोरदार चर्चा, भाजपावर नाराजी?
दिल्ली दि १(प्रतिनिधी)- पंकजा मुंडे या २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून भाजपात एकाकी पडल्या आहेत. दरवेळेस विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा होते. पण पक्षाकडून अद्याप त्याचे पुर्ववसन झालेले नाही. नाही म्हणायला पक्षाने त्यांना राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. पण तरीही राज्याच्या राजकारणात रस असलेल्या पंकजा मुंडे सतत चर्चेत असतात आता देखील आपण भाजपावर नाराज आहोत असे संकेत पंकजा मुंडे यांनी दिले आहेत.
पंकजा मुंडे दिल्लीत रासपच्या कार्यक्रमात केलेल्या एका विधानावरून पुन्हा एकदा त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला लोक म्हणतात पक्ष माझा. पण मी भारतीय जनता पक्षाची आहे. पण पक्ष माझा नाहीये. भारतीय जनता पक्ष खूप मोठा आहे”. याशिवाय, “आम्हाला काहीच नाही मिळालं तर मी जाईन ऊस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला, रासप माझ्या भावाचा पक्ष आहे. वडिलांशी भांडण झालं तर मी भावाच्या घरी जाईन. यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडणार आणि महादेव जानकर यांच्या रासपत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. याआधी भाजपा माझ्या वडिलांनी मोठा केला मी पक्ष का सोडु असे पंकजा म्हणाल्या होत्या. पण आता वडिलांशी भांडण झालं तर मी भावाच्या घरी जाईन असे म्हणत त्यांनी आपल्या आगमी राजकीय वाटचालीचे संकेत दिले आहेत. अर्थात याआधी त्यांची नाराजी बाहेर आल्यानंतर त्या राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यापैकी एका पक्षात जाणार अशी अटकळ बांधली जायची पण आता त्यांनी आपण कोणत्या पक्षात जाणार यांचे स्पष्ट संकेत दिल्यामुळे भाजपाच्या हातून ओबीसी मतदार दुरावण्याची शक्यता आहे.
पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावरून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. पंकजा मुंडे राष्ट्रीय समाज पक्षात जाऊ शकतात, असंही बोललं जात आहे. तर, पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असतील तर धनंजय मुंडे आणि जिल्ह्यातील इतर नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. तर संजय राऊत यांनी तर त्यांना राजकारणातून सन्यास घेण्याचा सल्ला दिला आहे.