राज्यात अनेक राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये पाणी पातळीने तळ गाठला असून हंडाभर पाण्यासाठी खेडापाड्यातील लोकांना कैक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.पावसाने राज्यात जर का उशीरा हजेरी लावली तर राज्यातील पाणीटंचाईची समस्या आणि दुष्काळाची परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांसाठी सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. पण आता तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. जयंत पाटील यांनी X या सोशल मीडिया साइटवर याबाबतची पोस्ट करत सरकारला खडेबोल सुनावले आहेत. तर, इलेक्शनच्या मोडमधून सरकार बाहेर पडले असेल तर त्यांनी थोडे इकडे लक्ष द्यावे, असे थेटपणे त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारला टोला लगावला आहे.
“मागील वर्षी हवा तसा पाऊस झाला नाही म्हणून संपूर्ण राज्याला दुष्काळाची झळ बसणार हे आम्ही विरोधक म्हणून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापासून सांगत आलो आहे. मात्र देशातील आणि राज्यातील राज्यकर्त्यांना निवडणुकांच्या जुळवाजुळवीतून उसंत मिळाले तर याकडे लक्ष दिले जाईल ना.राज्यातील एकूण 19 जिल्ह्यांतील 40 तालुक्यात गंभीर व 16 तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. राज्यातील एकूण 2292 महसूली मंडळापैकी 1532 महसूली मंडळात दुष्काळ जाहीर केला होता. मात्र आज राज्यातील 75 टक्क्यांपेक्षा जास्त भाग दुष्काळाच्या छायेत आला आहे.राज्यातील धरणांमध्ये 10-20% इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. उदा. उजनीत 0.0 % पाणीसाठा आहे तर जायकवाडीत 5.65 % आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मुळा, निळवंडे, भंडारदरा मध्ये फक्त 9% पाणी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत सरकार पाण्याचे टँकरही उपलब्ध करत नाही. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देत नाही. मागे मराठवाड्यात फक्त शोबाजीसाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती का ? असा प्रश्न उद्भवतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांनी राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीबाबत आज पत्रकार परिषद घेतली होती. तसेच काही मागण्याही आदरणीय पवार साहेबांनी सरकारकडे केल्या आहेत. इलेक्शन मोडमधून बाहेर आले असेल तर सरकारने या मागण्यांवर तातडीने लक्ष द्यावे.”प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या यांनी ही पोस्ट करच सरकारवर निशाणा साधला आहे. तर, दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यातील दुष्काळासंदर्भात जी बैठक झाली होती, ती केवळ शोबाजीसाठी झाली होती का?असा खोचक सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे. तर विरोधक म्हणून आम्ही नागपूरात झालेल्या हिवाळी अधिवेशनापासून सरकारला याबाबत माहिती देण्याचा आणि उपाययोजना करण्यास सांगितले होते, पण त्यांनी त्यावेळी लक्ष दिले नसल्याचेही पाटलांकडून या पोस्टच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
शुक्रवारी (ता. 24 मे) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत, राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. तर, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर तेथील परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिथे आवश्यकता आहेत तिथे टँकर सुरू करावेत. राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलून या विमा कंपन्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात. वीज बिलात सूट द्यावी. बिल भरले नाही म्हणून शेतकऱ्यांची वीज खंडित करू नये, यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या आहेत.