Latest Marathi News
Ganesh J GIF

सासू आणि दुसऱ्या पत्नीची हत्या करणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

चष्मा कव्हरने पोलीसांनी काढला आरोपीचा माग, सासू आणि पत्नीच्या हत्येचे धक्कादायक कारण समोर

रायगड दि २१(प्रतिनिधी)- दोन महिलांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे.मुख्य आरोपीसह त्याच्या तिघा साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिरकोन-सारडे गावाच्या रस्त्यालगत १० जुलैला लाल साडी परिधान केलेल्या एका अज्ञात महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

भारती आंबोरकर आणि त्यांची मुलगी प्रिती गंभीर यांचा खून झाला होता. त्यांची हत्या मयुरेश गंभीर याने केली होती. भारती या आरोपीच्या सासू तर प्रीती ही आरोपीची दुसरी पत्नी होती. प्रितीची ऑगस्ट २०२२ मध्ये हत्या करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार सारडे गावाच्या हद्दीत लाल साडी नेसलेल्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली. मृतदेहा शेजारी महिलेच्या चष्म्याचे पाऊच आढळून आले. त्यावरुन पोलीसांनी ही महिला डोंबिवलीत राहत असल्याचे समजले. तिथे चाैकशी केलीअसता ९ जुलैला भारती यांना जावई मयुरेशने अलिबागमधील पोयनाड येथे बोलावले होते, अशी माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी मयुरेश अजित गंभीर याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीसांनी त्याला शोधून काढत चाैकशी केली असता तिघा साथीदारांच्या मदतीने आपल्या गाडीतच त्यांचा जीव घेतल्याचं त्याने सांगितलं. डोक्यात दोन गोळ्या झाडून रस्त्याच्या कडेला टाकला त्याचबरोबर मानेवर देखील भोसकल्याचे त्याने सांगितलं. यावेळी त्याने आपणच आपली दुसरी पत्नी प्रितीची हत्या केल्याचे कबूल केले. तो २०१४ मध्ये कारावासात जाण्यापूर्वी दिलेले नऊ लाख रुपये परत देण्यास नकार दिल्याने तिची हत्या केली. आणि सासू या प्रकरणी फिर्यादी असल्याने त्यांचा खून केल्याचे आरोपी मयुरेशने सांगितले आहे. अवघ्या काही तासात उरण पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावला. त्याचबरोबर त्याचे दोन साथीदार दिलीप गुंजलेकर, दीपक उर्फ बाबू, आबरार अन्वर शेख यांना देखील अटक केली आहे. मयुरेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने तो एका गुन्ह्यात अटकेत होता.

आरोपी मयुरेश गंभीर याने पोयनाड येथील सचिन तावडे यांचा २००७ साली गोळी झाडून खून केला होता. याप्रकरणी त्याला अलिबाग सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याशिवाय त्याने निवडणूक अधिकाऱ्यांना देखील मारहाण केली होती. पण पुराव्याअभावी गेल्या वर्षी खुनाच्या गुन्ह्यातुन तो निर्दोष सुटला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!