अजित पवार गटाच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची निवड
राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटाकडून नियुक्त्यांचा सिलसिला,अजित पवारांना मोठा पाठिंबा
पुणे दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट) पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप बाळासाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर पदावर देखील नियुक्ती करण्यात आल्या आहेत.
प्रदीप देशमुख हे विद्यार्थी दशेपासूनच काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण आणि समाजकारणात कार्यरत आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने आंदोलने केली होती. विरोधी पक्षात असताना जनहिताच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारी अभिनव आंदोलने करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज पुणे शहरात तसेच राज्यभर नेहमीच बुलंद ठेवला होता. प्रवक्ते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अत्यंत ठामपणे मांडणारे देशमुख अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी आपला पाठिंबा अजित पवार गटाला जाहीर केला होता. कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रदीप देशमुख यांनी सांगितले की “आमचे नेते अजितदादा पवार यांनी विकासाच्या मुद्द्यावर सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कार्यरत राहू. जनता आणि सरकार यांच्यामधील दुवा म्हणून आपण काम करणार आहोत. “समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण आहे. त्याला अनुसरून सर्व घटकांसोबत संवाद ठेवणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिका, मलेशिया तसेच आशियाई देशांमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदांमध्ये देशमुख यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना, शून्यातून कार्यकर्ता म्हणून सुरुवात करत केवळ सचोटी आणि कार्यक्षमतेच्या बळावर त्यांनी पुणे शहर कार्याध्यक्ष पदापर्यंत मजल मारली आहे. या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहेत.