राजकारणाला कंटाळत पंकजा मुंडे यांनी घेतला मोठा निर्णय
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणात मुंडेंची मोठी घोषणा, कार्यकर्ते संभ्रमात, काय घडले?
मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठा भूकंप झाला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राजकारणातून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मनात नेमके काय सुरु आहे. यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सक्रीय राजकारणातून विश्रांती घेत २ महिने राजकीय रजा घेणार असल्याची घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भुमिका मांडली. मागील दोन दिवसापासून त्या काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. पण आज त्यांनी त्याचा इन्कार केला आहे. मी भाजपामध्येच राहणार आहे. राहुल आणि सोनिया गांधी यांना भेटले नाही. माध्यमांनी चुकीची बातमी दाखवली. ही बातमी दाखवणाऱ्या संबंधित वृत्तवाहिनीवर मी मानहानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा मुंडे यांनी दिला. त्याचबरोबर त्यांनी राजकीय ब्रेकची घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या मला सक्रीय राजकारणातून ब्रेक हवा आहे. सध्याच्या राजकाराणाचा कंटाळा आल्यामुळे मी दोन महिने राजकारणातून सुट्टी घेत आहे. अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचे सांगत त्यासाठी ब्रेक घेत असल्याची घोषणा मुंडे यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी भाजपासोबत सत्तेत सामील होत, मंत्रीपद मिळवले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची अडचण झाली आहे. त्यामुळे त्या लवकरच भाजपातून बाहेर पडतील अशी अटकळ बांधली जात होती. पण मुंडे यांनी तूर्त तरी भाजपातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राहिली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नाही. पण पंडित दीनदयाळ उपाध्याय व अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप तसाच राहावी, अशी इच्छा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्यासोबत बंड करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे एकत्र आले होते. पंकजा मुंडे यांनी मंत्री झाल्याबद्दल धनंजय मुंडे यांचे औक्षण केले. तर राष्ट्रीय सचिव झाल्याबद्दल धनंजय मुंडे यांनीही पंकजा मुंडे यांचे अभिनंदन केले होते. धनंजय मुंडे यांनी या क्षणाचा व्हिडिओ शेअर करत पंकजांचे आभार मानले होते.