Latest Marathi News
Ganesh J GIF

भांडणाची तक्रार करायला गेलेल्या ८ वर्षांच्या चिमुरड्याचा मुख्याध्यापकाने घेतला चावा; गुन्हा दाखल

शाळेमध्ये मुलांनी दंगा केल्यास किंवा भांडण केल्यास शिक्षकांनी त्यांना समज देणे किंवा सौम्य शिक्षा करणे हे सामान्य मानले जाते. मात्र, अहिल्यानगर शहराजवळील एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुख्याध्यापकाचे एक अमानुष वर्तन समोर आले आहे.

भांडणाची तक्रार करणाऱ्या इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या एका ८ वर्षीय विद्यार्थ्याचा मुख्याध्यापकाने गळा दाबून त्याला वर उचलले आणि नंतर त्याच्या हाताला थेट चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.

“भांडण कसं करतात ते मी दाखवतो!”; नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, वर्गातील काही मुलांमध्ये आपापसात भांडण सुरू होते. वर्गात शांतता राहावी म्हणून या ८ वर्षीय चिमुरड्याने ही बाब आपली वर्गशिक्षिका ज्योती मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिली. वर्गशिक्षिकांनी यानंतर शाळेचे मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांना वर्गात बोलावले.

मुख्याध्यापक वर्गात आल्यानंतर त्यांनी आधी भांडण करणाऱ्या मुलांचे कान पिळले. मात्र, त्यानंतर संतापलेल्या मुख्याध्यापकांनी, तक्रार करणाऱ्या त्याच निष्पाप मुलाला समोर बोलावले आणि “भांडण कसे करतात ते मी तुला दाखवतो,” असे म्हणत त्याचा गळा पकडून त्याला थेट हवेत वर उचलले. एवढ्यावरच न थांबता मुलाला खाली उतरवून त्याच्या हाताला जबर चावा घेतला.

घरी गेल्यावर मुलाने दाखवल्या जखमा; पालकांना धक्का

शाळेतून घरी परतल्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थ्याने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलाच्या हातावरील चाव्याची जखम पाहून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांना फोन करून जाब विचारला.

पालकांच्या म्हणण्यानुसार, फोनवर बोलताना मुख्याध्यापकाने, “माझ्याकडून चुकून ही घटना घडली असून मी लेखी माफी मागायला तयार आहे, कृपया तुमचा पत्ता द्या,” अशी विनवणी केली. मात्र, शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या वर्तनामुळे संतप्त झालेल्या पालकांनी थेट पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला.

मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे याच्याविरुद्ध नगर तालुका (ग्रामीण) पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास आणि चौकशी युद्धपातळीवर सुरू केली आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!