पुणे: ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतेवेळी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी ‘हिजडा’ या शब्दाचा वापर केला. त्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालया जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या राज्य समन्वयक शामिभा पाटील यांनी आंदोलन केले.
त्यावेळी शामिभा पाटील यांच्यासोबत असलेल्या अन्य सहकार्यांना बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या घटनेची माहिती ठाकरे गटाच्या उपनेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर, अॅड. असीम सरोदे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट घेऊन पोलिसा सोबत चर्चा केली. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केली.
यावेळी तृतीपंथी हक्क समितीच्या राज्य समन्वयक शामिभा पाटील म्हणाल्या की, आमच्या हक्कासाठी आम्ही लढा देत असून आम्हाला न्याय मिळावा यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी पुढे येत नाही. पण त्याच दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतेवेळी हिजडा या शब्दाचा वापर केला आहे.
त्या विधानाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी बंड गार्डन पोलिसा कडे मागणी केली. आमच्या मागण्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन केले. तर पोलिसांनी अमानुष पद्धतीने वागणूक दिली आहे. त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करीत असून जोवर नितेश राणे विरोधात गुन्हा दाखल होत नाही आणि कारवाई होत नाही. तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.