
जलसमाधी आंदोलन करताना आंदोलक गेला वाहून
आंदोलक वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल, ग्रामस्थांचा अधिका-याला चोप, गावात तणाव, पोलीस दाखल
बुलढाणा – गावातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जलसमाधी आंदोलन करायला जमलेल्या ग्रामस्थांमधून एकाने अचानक नदीत उडी घेतल्याने तो वाहून गेला आहे. या अनपेक्षित प्रकाराने सगळे भांबावले. पण त्यानंतर नदीत उडी घेतलेल्या शेतकऱ्याचा शोध सुरू करण्यात आला. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात जिगाव येथे घडली आहे.
जिगाव प्रकल्पातील आडोळ खुर्द गावातील ग्रामस्थांना अनेक समस्या भेडसावत असून, त्यांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. घरांसाठी कमी मोबदला, दोन वर्षात गावठाणात प्लॉट देण्याऐवजी २०२३ मध्ये दिले गेले. २०१६ जी रक्कम मोबादला म्हणून दिली गेली, त्यात घर घेणं शक्य नाही. त्याचबरोबर नवीन गावठाण तयार होत असताना ठेकेदार व सरकारी अधिकारी यांच्या संगनमताने गावठाणातील कामे ही अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. वारंवार प्रशासनाकडे दात मागूनही न्याय मिळत नसल्याने गावकऱ्यांनी अखेर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी मुलं बाळांसकट हे गावकऱ्यांनी जिगाव प्रकल्पाच्या पूर्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन सुरू असतानाच काही ग्रामस्थ आणि प्रकल्प अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. या चर्चेत त्यांच्यातील आवाज वाढला आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याच वेळी गौलखेड गावातील विनोद पवार या शेतकऱ्याने प्रशासनाचा निषेध म्हणून संतापाच्या भरात थेट पूर्णा नदी पात्रातच उडी मारली. हे सगळे इतके अनपेक्षित घडले की काही क्षण कुणालाच काही कळले नाही. शेतकरी विनोद कुमार यांनी जलसमाधी आंदोलनात पूर्णा नदीत उडी घेतल्यानंतर कोणीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, असा आरोप पवार यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर तातडीने एनडीआरएफचे पथक मदतीला दाखल झाले. त्यांनी विनोद पवार यांचा शोध सुरू केला. मात्र, या परिस्थितीला जबाबदार धरत स्थानिकांनी एका अभियंत्याला चांगलाच चोप दिला. तसेच या प्रकरणात दोषी अधिकारांवर कारवाईची मागणी विनोद पवार यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
प्रशासनाच्या वतीने शोध कार्य सुरू असून, आंदोलकही आक्रमक झाले आहेत. आमदार संजय कुटे हे घटनेची माहिती मिळताच गावात दाखल झाले. परिस्थितीवर नियंत्रणासाठी दंगा काबू पथक आणि पोलिसांना पाचरण करण्यात आले आहे.