अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा दुसऱ्या क्रमांकाचा मान
साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ति'चा जयजयकार, पहिला क्रमांक 'या' राज्याला
दिल्ली दि ३०(प्रतिनिधी)- प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र चित्ररथला दुसरा क्रमांक मिळाला आहे. साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्ती यांचा गौरव करणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर उत्तराखंडच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला होता. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्रीक्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि नाशिकमधील वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन कर्तव्यपथापवर झाले. यावर्षी महाराष्ट्रासह १७ राज्यांची आणि विविध केंद्रीय मंत्रालयांची १० अशी एकूण २७ चित्ररथे कर्तव्यपथावर झळकली होती. महाराष्ट्र राज्याचे यापुर्वी ४० वेळा राजधानीत होणाऱ्या मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केली आहेत.
महाराष्ट्रातील चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती. शुभ ऍड या संस्थेने चित्ररथाचे काम केले. साडेतीन शक्तिपीठाची महिमा सांगणाऱ्या गीताला संगीत सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी दिले होते. तर, हे गीत प्राची गडकरी यांनी लिहीले होते. यासह चित्ररथावर दिसणारे कलाकार हे विजनरी परफॉर्मिंग कला समुह, ठाणे इथले होते. दुसरा क्रमांक पटकावत महाराष्ट्राने आपला दबदबा कायम राखला आहे.