पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच, अल्पवयीनही सामील
कोयता गँगच्या दहशतीचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांचा वचक राहिलाय का?
पुणे दि ३०(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरूच आहे. पोलिसांनी कारवाई करून देखील गुन्हेगारी वाढत आहे. अशीच एक घटना येरवडा परिसरात उघडकीस आली आहे. फुटबॉल खेळतांना झालेल्या किरकोळ वादावरून चौघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार केले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
याप्रकरणी अब्दुल्ला आमीरउल्ला खान यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार गजराज चौकात २८ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता घडला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. सुमारे सहा महिन्यांपूर्वी फुटबॉल खेळण्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग मनात धरुन फिर्यादी हे त्यांच्या मित्रांबरोर मोटारसायकलवरुन जात होते. तेव्हा लक्ष्मीनगरमधील गजराज चौकात चौघा अल्पवयीन मुलांनी त्यांना अडविले. त्यांच्यावर कोयत्याने वार केला. लाकडी बांबुने मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यांचा मित्र महेश मिश्रा यास लाकडी बांबुने मारहाण करुन परिसरात दहशत निर्माण केली. तेथील दोन रिक्षांच्या काचा फोडून त्यांचे नुकसान केले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, पोलिसांचा वचक राहिला आहे का? असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. कोयता गँग अन् स्ट्रीट क्राईमचा आलेख वाढविणाऱ्या गुन्हेगारांनी शांतताप्रिय पुण्याची ओळख पुसून टाकली आहे.