पुणे दि १२ (प्रतिनिधी)- पुणे पोलीस दादागिरी करून नागरिकांना बंद खोलीत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओत एका खोलीत काही जण खाली बसलेले दिसत आहेत. तर पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक एकाला शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे कायदा हातात घेणा-या अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
पुणे पोलिसांचे नवनवीन प्रताप समोर येत आहेत कालच एका महिला पोलीस कर्मचारी एका हमालाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तर आता पुराणिक एका बंद खोलीत नागरिकांना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पुराणिक या आधीही वादात राहिलेले आहेत. एका महिन्यापूर्वी वॉटर बारमध्ये जेवणासाठी आलेल्या महिला आणि मुलींना त्यांनी मारहाण केली होती. वाहतूक शाखेत असताना मागील वर्षीच नाना पेठेत एका वाहन चालकाला दुचाकीसह उचलून टेम्पोत भरण्याचा धक्कादायक प्रकार पुराणिक यांनी केला होता.
नागरिकांना अशाप्रकारे खोलीत डांबून, अश्लील भाषा वापरून बेदम मारहाण करण्याचा अधिकार राजेश पुराणिक यांना कोणी दिला, असा सवाल केला जात आहे. वेळोवेळी तक्रार करूनही वरिष्ठ पोलीस अधिकारी पुराणिक यांना पाठीशी घालत असल्याचेच दिसत आहे.त्यामुळे रक्षकच कायदा हातात घेऊ लागले तर सामान्यांनी करायचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.