पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, पुणे शहरातील फुरसुंगी भागात चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकावर धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना काल गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली आहे.प्रतीक कामठे (२२), शुभम गायकवाड (१९), सोन्या पोटे (२२), अनिकेत कटके (२०), स्वराज दोरगे (२१, रा. सर्व, फुरसुंगी) असं गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वैभव विठ्ठल गायकवाड (२२, रा. वडकी) असं हत्या झालेल्याचं नाव आहे. गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास फुरसुंगीतील परदेशी माळ येथील मीठाच्या गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या सुंदरबन सोसायटी रस्त्यावर ही घटना घडली. याबाबत शिवलिंग ज्ञानदेव पांढरे (२०) याने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी पांढरे हा त्याचा मित्र वैभव गायकवाड याला घेऊन दुचाकीवरून फुरसुंगीतील सुंदरबन सोसायटी रस्ता परिसरातून जात होता. त्यावेळी मागून दोन दुचाकीवरून प्रतीक कामठे, शुभम गायकवाड, सोन्या पोटे, अनिकेत कटके, स्वराज दोरगे तेथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या रागातून वैभव याच्यावर धारदार हत्याराने वार केले. लाकडी दांडक्याने मारहाण करून वैभवला गंभीर जखमी केले. यातच वैभवचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख, पोलीस निरीक्षक विश्वास डगळे यांच्यासह अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके करत आहेत.