पुण्यातील भाईंनी पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्यानंतर आता याच भाईंना खाकीची धडकी भरल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स डिलीट करायला सुरुवात केली आहे.या रिल्समुळे सध्या पुणे शहरात गुन्हेगारी वाढत आहे. लहान मोठे भाई थेट (Reels)असे रिल्स अपलोड करुन दहशत निर्माण केली जात आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची सोशल मीडियावर गुन्हेगारीचे रिल्स टाकणाऱ्या टोळ्यांवर करडी नजर असणार आहे.
पुण्यात गुन्हेगारांना पोलिसांनी चांगलीच तंबी दिली आहे. कोणताही गुन्हा करायचा नाही, कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठींबा द्यायचा नाही, सहभागी व्हायच नाही, गुन्हेगारीच उदात्तीकरण करणारे व्हिडिओ करायचे नाहीत, रिल्स बनवायचे नाहीत, स्टेटस ठेवायच नाही, अशा सूचना दिल्या आहेत. असं सांगूनही काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करताना दिसले. त्यावरुन आता पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
हे रिल्स पाहून पोलिसांनी गजानन मारणे पासून ते निलेश घायवळपर्यंत सगळ्यांनात दम दिला. असे रिल्स पोस्ट करु नका सांगूनही हे रिल्स का पोस्ट केले जात आहेत?, असा जाब पुणे पोलिसांनी विचारला असता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रिल्सशी आमचा काही संबंध नाही, शहरातील अट्टल गुन्हेगारांनी पोलिसांना जबाब दिला आहे. पुणे पोलिसांनी हे जाहीरपणे सांगून काही तास उलटायच्या आतच गुन्हेगारांच्या सोशल मीडिया अकाउंट वर गुंड निलेश घायवळ याचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अपलोड झाल्याचे समोर आले होते. हे व्हिडीओ शोधून डिलीट करण्याची प्रक्रिया सुरु आहेत.
अजित पवारांकडून गुन्हेगारांना तंबी
पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारांची काढलेली परेड चांगलीच चर्चेत आहे. सगळ्यांना दम देऊनही पोलिसांचे आदेश न मानता सोशल मीडियावर रिल्स पोस्ट करणं सुरुच असेल आणि परेड काढूनही कोणाची मस्ती असेल तर पोलीसी खाक्या दाखवायला लागेल, अशा खड्या शब्दांत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गुन्हेगारांना इशारा दिला आहे.
मुन्ना पोळेकरचं दहशत निर्माण करणारं रिल व्हायरल
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मारेकरी असलेला मुन्ना पोळेकरने देखील असेच गुन्हेगारीचे रिल्स अपलोड केले होते. मैत्रीची दुनिया, येरवड्यात भेटा, वगरे भाष्य करत त्याने रिल्स अपलोड केले होते. मोठ्या गुन्हेगारांच्या टोळीत काम करणारे लहान-मोठे गुन्हेगार दहशत निर्माण करण्यासाठी असे रिल्स पोस्ट करतात. मात्र आता या सगळ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.