Latest Marathi News

इंन्स्टावर ओळख, लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार अन् गर्भपात, मांजरी बुद्रुक परिसरातील घटना

          फेसबुक, व्हॉट्सअप, इंन्स्टाग्राम तसेच इतर सोशल नेटवर्किंग साईटवर अनेकजण दिवसातला बराच वेळ खर्ची घालतात. मात्र, अशाच सोशल मीडियावर ओळख करुन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे प्रकार समोर येत आहेत. पुण्यात राहणाऱ्या एका 22 वर्षीय मुलीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख करुन,तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यातून तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी डॉक्टर दाम्पत्यासह 9 जणांना ताब्यात घेतले आहे.  याबाबत मांजरी बुद्रुक येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने बुधवारी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन निरंजन बाजीराव घुले, त्याचे वडील बाजीराव घुले, आई, दाजी मल्हार कुंजीर, मित्र समीर चौधरी, डॉ. टी. वाय मोटे व डॉ. राजश्री मोटे व इतर दोन अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 376/2/एन, 313, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. हा प्रकार मार्च 2022 ते आजपर्यंत पीडित मुलीच्या राहत्या घरात घडला आहे.
              पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी यांची ओळख इंन्स्टाग्रामवर मार्च 2022 मध्ये झाली. आरोपीने मुलीसोबत मैत्री करुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मुलीच्या घरी जाऊन तिला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच फिर्यादी अंघोळ करत असताना आरोपीने लपून तिचा न्यूड व्हिडिओ व फोटो काढले. फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

              पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर आरोपीच्या आई-वडिलांनी गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. तसेच गर्भपात केला नाही तर उजनी धरणात फेकून मारुन टाकू अशी धमकी दिली. आरोपींनी मुलीला जबरदस्तीने उरळी कांचन येथील एका हॉस्पिटलमध्ये नेले. त्याठिकाणी आरोपी डॉक्टरांनी तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!