मुंबई दि २७(प्रतिनिधी)- मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये झालेल्या वादातून रेल्वे पोलीस आणि त्याच्या मित्राला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मारहाण करणाऱ्यांमद्ये सराईत गुन्हेगारांचाही सहभाग असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी कोपर खैरणे पोलीस ठाण्यात १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
दीपक कोल्हे असे मारहाण झालेल्या रेल्वे पोलिसाचे नाव आहे.या राड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे रेल्वे पोलीस दलात असलेले कोल्हे काही दिवसांपासून सुट्टीवर असून घटनेच्या दिवशी ते रात्री मित्रासोबत क्वालिटी पंजाब हॉटेलमध्ये बसलेले होते. त्याचवेळी कोल्हेंच्या बाजूच्याच टेबलवर काही तरुण देखील बसलेले होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादातून त्या तरुणांनी कोल्हे आणि त्यांच्या मित्राला बेदम मारहाण केली.या मारहाणीत हाॅटेलच्या टेबल, खुर्च्या यासह बियरच्या बाटल्या याचीही तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात कोल्हे आणि त्यांचा मित्र जखमी झाला आहे. पण नेमक्या कोणत्या मुद्द्यावर शाब्दिक वाद झाला याचे उत्तर मिळू शकले नाही. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात काही क्षणात हाॅटेलचे रूपच बदलून गेल्याचे दिसत आहे.

या घटनेप्रकरणी कोपर खैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून दोघांना अटक करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये काही सराईत गुन्हेगारांचा देखील समावेश असल्याचे समजते. तर या घटनेमुळे मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरु ठेवून मद्यपान चालत असल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.