
राज आणि उद्धव ठाकरे मी मुंबईत येतोय, औकात असेल तर हात लावून दाखवा
काली सेनेचे स्वामी आनंद स्वरुप यांचे ठाकरे बंधूंना आव्हान, हात तोडून टाकण्याची धमकी, ट्विट करत दिला 'हा' इशारा
दिल्ली – मुंबईत वरळी डोम येथे तब्बल २० वर्षांनंतर मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. यापुढेही एकत्रच राहणार अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. पण हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने आता मराठी विरुद्ध अमराठी असं रूप घेतलं आहे. त्यात आता एका महाराजांनी उडी घेतली आहे.
मराठीत न बोलल्याने मीरारोड येथे एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. केडीया यांनी आता माफी मागितली असली तरी त्यांनीही मराठी बद्दल अवमानकारक वक्तव्य करत राज ठाकरे यांना आव्हान दिले होते. त्यात आता आणखी एकाची भर पडली असून काली सेनेचे स्वामी आनंद स्वरुप यांनी ट्विट करत ठाकरे बंधूंना ओपन चॅलेंज दिले आहे. स्वामी आनंद स्वरुप यांनी ट्विट करत ‘मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनाही खुले आव्हान देत आहे. मी लवकरच मुंबईत येईन आणि तिथे उभा राहून हिंदीत बोलेन, बघूया कोण मला थांबवते,’ असं आव्हान केले आहे. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मी मुंबईत येतोय, औकात असेल तर हात लावून दाखवा, हात तोडून नाही टाकले तर बघा, असही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या दोन छोट्या छोट्या टोळ्या आहेत. ज्या आता सत्तेतही नाहीत. त्यांची काय हिंमत आहे की त्यांनी मुस्लिमांना सांगावं की अजान तुम्ही अरबीमध्ये देऊ नका, मराठीत द्या!” अशी टीका आनंद स्वरूप यांनी केली आहे. तसेच माझ्या लोकांवर हात उचलता. माझ्या लोकांना मारता. भाषेच्या आधारावर देशाची फाळणी करता. आमच्यासाठी तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी, भोजपुरी, मराठी आदी भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्वच भाषा महत्त्वाच्या आहेत. या सर्व भाषा मिळूनच भारत बनतो. तुम्ही कुणावरही काही लादू शकत नाही. अन्यथा उद्या तुमचे खासदार दिल्लीत आले तर त्यांना पकडून त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांचे स्वागत केले जाईल. त्यांच्या कानशिलात हाणली जाईल, अशी धमकी त्यांनी दिली आहे.
https://x.com/kalisenachief/status/1940807061564280976?
स्वामी आनंद स्वरुप यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आता शिवसेना आणि मनसेकडून यावर काय प्रतिक्रिया येणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान आनंद स्वरूप नेमके कधी येणार याची माहिती मिळू शकली नाही.