मुंबई दि १ (प्रतिनिधी) – मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती. पण आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस वितरक कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. सोमवारपासून म्हणजेच १ ऑगस्ट पासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट करण्यात आली आहे. मात्र, ही घट केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरवर करण्यात आली आहे.व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये ३६ रुपयांची कपात करण्यात आली आहे. घरगुती गॅसचे दर मात्र कायम आहेत.
गेल्या तीन महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत चारवेळा कपात करण्यात आली आहे. जूनपासून व्यावसायिक सिलिंडर सुमारे ३७८ रुपयांनी स्वस्त झाला आहे. आता दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर १९७६.५० रुपये इतका आहे. तर मुंबई, पुणे येथे अनुक्रमे १९३६.५० आणि २१४१ रुपये इतका दर असणार आहे. मध्यंतरी मात्र घरगुती गॅसच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. पण आता दर कपात करण्यात आल्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
मात्र, आज घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला होता. देशात १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमती कायम आहेत. एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या असल्या तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या बाबतीत जनतेला कोणताही दिलासा मिळालेला नाही.