कर्नाटकप्रमाणे शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे सांगलीत भव्य सत्कार सोहळा, सीमावासीयांना दिले हे आश्वासन
सांगली दि २५(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी भाजपाला घरी बसवले, महाराष्ट्रातही शिंदे-फडणवीस सरकार अत्यंत भ्रष्ट आहे, हे भ्रष्ट सरकारही उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.
सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर महानिर्धार २०२४ शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात सिद्धरामय्या बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहु महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली. डॉ. बाबासाहेबांचे संविधान नसते तर दिनदलित, शोषित, वंचित वर्ग मुख्य प्रवाहात आला नसता, त्याला समान हक्क मिळाले नसते. जातीयवादी भाजपा सरकार मात्र घटनाच बदलण्याची भाषा करत आहे. गोलवलकर, सावरकर यांनी संविधान अस्तित्वात आल्यापासूनच विरोध केला आहे आणि आताही या विचाराचे लोक संविधानाला विरोधच करत आहेत. संविधान राहिले तरच आपले अस्तित्व राहिल म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी कोणताही त्याग व बलिदान देण्याची तयारी ठेवा.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २२४ पैकी १३६ जागांवर विजयी मिळवला. कर्नाटकात भाजपा जनतेच्या आशिर्वादाने सत्तेत येत नाही, ते ऑपरेशन कमळ करुन आमदार विकत घेऊन सत्तेत आले होते. कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवून भाजपा सत्ता स्थापन करते. काँग्रेसने कर्नाटकात भाजपाचा भ्रष्टाचार घराघरात पोहचवला व भाजपामुक्त कर्नाटक केले. सरकार स्थापन होताच जनतेल्या दिलेल्या ५ आश्वासनांवर २४ तासात निर्णय घेतला. असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा आपल्या देवी देवतांचा वापर फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठी करत असतो आणि निवडणुका होताच याच देवांचा अपमान करतो. कर्नाटकात भाजपाला भगवान श्रीराम व बजरंगबली यांनीच जागा दाखवून दिली. आता आदिपुरुष चित्रपटात भगवान श्रीराम व हनुमानाचा अपमान केला आहे. पंढपूरात जागोजागी पोस्टर लावले आहेत त्यातही पांडुरगांचा अपमान केला आहे. हे सरकार आपल्या दैवतांचा अपमान करत आहे, जनतेचा अपमान करत आहे.पांडुरंगाचा अपमान करणारे बोर्ड तातडीने काढून टाका. छत्तिसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये काँग्रेस विचारांचे सरकार आहे. या राज्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहे, नोकरीचे प्रश्न सोडवले जात आहेत. भाजपाच्या राज्यात मात्र नोकऱ्या संपवण्यात आला, आरक्षण संपवले. धनगर समाजाला २०१९ मध्ये आरक्षण देणार होते पण अजून दिलेले नाही. कर्नाटकात जसा भाजपाचा पराभव करुन काँग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय मिळवत महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता आणण्याचा आमचा संकल्प आहे.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा झाली त्याचाही परिणाम कर्नाटकाच्या विजयात दिसून येतो. महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजीतून खोटेनाटे दावे केले जात आहे. या खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू. जत भागातील पाणी प्रश्नावर कर्नाटक सरकार मदत करणार असल्याचे आश्वासन दिले त्याबद्दल आभारी आहोत पण सीमाभागातील लोकांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.