विरोधकानंतर आता भाजपाकडून ‘खोकेची’ घोषणाबाजी
एकनाथ शिंदे गटाची गोची, वर्षभरानंतरही आरोप खोडण्यात अपयश, बघा काय घडल
छ.संभाजीनगर दि २५(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपाच्या साथीने सरकार स्थापन करत मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर ५० खोके एकदम ओक्के अशी दिलेली घोषणाबाजी चांगलीच चर्चेत आली होती. शिंदे गटाकडून वारंवार पोलीस तक्रारीची दखल देऊनही त्या घोषणा कमी झाल्या नाहीत. पण आता मात्र भाजपाकडून शिंदे गटाविरोधात खोक्याची घोषणाबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्यांना त्यांच्यावरील पन्नास खोकेचा दावा खोडून काढता आलेला नाही. पण आता भाजपच्या आणखी एका नेत्याने चंद्रकांत पाटील ‘डोकेवाले’ मंत्री असून, ‘खोकेवाले’ नाहीत असा उल्लेख करत शिंदे गटाला डिवचले आहे. हे विधान भाजपाचे माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी केले आहे. एका कार्यक्रमात ते म्हणाले “भाजपचे केंद्रात आणि राज्यातही सरकार आहे. त्याची तुम्हाला मदत होईल. त्यातच तुम्हाला चंद्रकांत पाटील हे ‘डोकेवाले’ मंत्री मिळाले आहेत. ते ‘खोकेवाले’ नाहीत. त्यांचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल” असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाना साधला. विशेष म्हणजे याआधी नाशिकमध्ये देखील खासदार हेमंत गोडसे यांच्याविरोधात खोकेवाले गद्दार अशी वाक्य असलेली पत्रके व्हायरल करण्यात आली होती. विशेष म्हणजे यावर शोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या भाजपा नेत्याचे काैतुक करण्यात आले होते. आता या नव्या विधानामुळे वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
काही दिवसापूर्वी शिंदे गटाकडून वृत्तपत्रांमध्ये शिंदे हे फडणवीस यांच्यापेक्षा लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, असा उल्लेख करत देशात मोदी आणि राज्यात शिंदे असा नारा देण्यात आला होता. त्यानंतर नांदेडमध्ये ५० खोके आणि १०५ डोके असे बॅनर लावण्यात आले होते. पण आता या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.