Latest Marathi News
Ganesh J GIF

रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर घणाघात, पहा सविस्तर बातमी

राजकारणाच्या सुरूवातीला सुनील तटकरे आधी बॅरीस्टर अंतुले यांच्या सोबत होते, त्यांची साथ सोडली. शरद पवारांसोबत होते, त्यांची साथ सोडली.शेकापच्या जयंत पाटील यांच्या सोबत होते, त्यांची साथ सोडली. त्यामुळे वेळ येईल तेव्हा अजित पवारांची साथ सोडणारे सुनील तटकरे हे पहिले व्यक्ती असतील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली.

रायगड जिल्ह्यातील मुरूड येथे शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडीत पाटील, माजी आमदार अनिल तटकरे, आस्वाद पाटील, चित्रलेखा पाटील, प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रोहित पवार सभेला संबोधित केले.

रोहित पवार म्हणाले, दिल्लीची ताकद कितीही मोठी असली तरी महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणार नाही. केंद्रात आणि राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार असताना सुप्रिया सुळे खासदार होत्या, पण आपल्या मुलीला डावलून शरद पवारांनी पक्षातील नेत्यांना मंत्रीपदे दिली. आज हे नेते त्यांना सोडून गेलेत आणि आम्हाला पवार साहेबांनी काय दिले असा प्रश्न विचारत फिरत आहेत.

रोहित पवार पुढे म्हणाले, आमच्याकडून सत्तेत गेले तेव्हा नऊ खासदार आणि नव्वद आमदारकीच्या तिकीटांची स्वप्न पाहत होते. आज त्यांना चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.येणारी निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे.त्यामुळे भाजप पुरस्कृत उमेदवारांना लाखांच्या मताधिक्याने पाडा.
तर शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील म्हणाले, १९७७ साली इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावून जी चूक केली होती.तीच चूक आज मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार करत आहे.लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा येते तेव्हा लोक सत्ता उलथून लावतात.त्यामुळे आणीबाणीनंतर जी परिस्थिती काँग्रेसची झाली होती. तीच परिस्थिती भाजपची होणार, ईडीच मोदी सरकार बुडवेल.

जयंत पाटील म्हणाले, गेल्या निवडणूकीत आम्ही तटकरेंना मदत केली पण आता ती चूक सुधारायची आहे.तटकरेंचा पराभव करून बदला घ्यायचा आहे. आजही जिल्ह्यात शेकापची पाच लाख मते आहेत.नेते गेले तरी जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे मावळ आणि रायगड लोकसभा निवडणूकीत आमची ताकद दाखवून देऊ.यावेळी माजी आमदार अनिल तटकरे आणि पंडीत पाटील यांचीही भाषणे झाली

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!