
जळगावात जावयाची हत्या करत सैराटची पुनरावृत्ती
पळून जावून लग्न केल्याने जावयाची भररस्त्यात निर्घुण हत्या, कुटुंबीय जखमी, तणावाची स्थिती
जळगाव – पाच वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या मंडळींनी कोयता आणि चोपरने वार करत जावयाला ठार केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहा जणांना अटक केली आहे.
मुकेश रमेश शिरसाठ असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश रमेश शिरसाठ याने पाच वर्षांपूर्वी पूजा नावाच्या युवतीसोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. तेव्हापासून शिरसाट कुटुंबीय आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू होते. पुजाच्या माहेरचे यामुळे प्रचंड संतप्त होते. घटनेच्या दिवशी, रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला. त्यावेळी मुलीच्या माहेरच्या मंडळींनी कोयता आणि चोपरने मुकेशच्या मानेवर वार केला. यात गंभीर दुखापत झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला. मुकेशवर वार होत असताना त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुकेशचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही मुलीच्या माहेरच्यांनी वार केले असून यात कुटुंबातील ७ जण जखमी झाले आहेत. गुन्हा दाखल केलेल्यामध्ये सतीश केदार, प्रकाश सोनवणे, सुरेश बनसोडे, बबलू बनसोडे, राहुल सोनवणे, पंकज सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी गांगले, बबल्या गांगले यासह इतर दोन अनोळखी आरोपींचा समावेश आहे. प्रेमविवाह केल्यानं माझ्या कुटुंबियांनी पतीची हत्या केली. पतीच्या हत्येमुळे माझ्यासह लहान मुलींचं भविष्य अंधारात गेलंय. पतीची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पूजा शिरसाठ यांनी केली आहे.
मुकेशच्या कुटुंबातील सात जणांनाही गंभीर जखमी करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सात जणांवर गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक करण्यात आली. ही घटना जळगावमध्ये सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती असल्याची चर्चा सुरू आहे.