
मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- एनसीबीचे माजी विभागीय संचालक आणि आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यासह चौघाजणांनी जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. पण ती फेटाळून लावण्यात आली आहे. हा मलिक यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
प्रशासकीय सेवेतील नोकरी मिळवताना समीर वानखेडे यांनी आपली खोटी जात सांगितल्याचा आरोप मलिक यांनी वानखेडेवर केला होता. ते धर्माने मुस्लीम आहेत, असा दावा मलिक यांनी केला होता. मात्र, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने या तक्रारीत कोणतेही सत्य नसल्याचे सांगत ती तक्रार फेटाळून लावली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे समीर वानखेडे प्रकाशझोतात आले होते.पण वानखेडे यांच्या तपासाविषयी अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. नवाब मलिक यांनी हे प्रकरण लावून धरले होते. त्यांनी समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा दाखला प्रसारमाध्यमांसमोर मांडला होता.
राज्यात नवीन सरकार येताच रोज महाविकास आघाडीच्या निर्णयांना रद्द करण्याबरोबरच वादग्रस्त मुद्यांवर देखील क्लिनचिट दिली जात आहे. संजय राठोड यांना क्लिनचिट देत मंत्रिमंडळात घेण्यात आले होते. तर आता समीर वानखेडे यांना देखील क्लिनचिट देण्यात आली आहे.