
अजितदादांकडे चाललेले संजय जगताप भाजपात प्रवेश करणार
पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात, भाजपा प्रवेशामागे आहे पुढची तयारी, पडद्यामागे नक्की काय घडले?
पुणे – काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. पुरंदर हवेलीचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी सासवडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी स्वत: जगताप यांनीच या प्रवेशाची माहिती दिली आहे. यामुळे पुणे जिल्हा विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलणार आहे.

पुरंदर हवेलीचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी आज सासवडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी स्वत:जगताप यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपसोबत आम्ही बिना हुंड्याचं लग्न केलं आहे. यामध्ये माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसल्याची प्रतिक्रिया संजय जगताप यांनी दिली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांनी संजय जगताप यांचा प्रचार केला नाही आणि महाविकास आघाडीने देखील साथ दिली नाही अशा स्वरूपाची तक्रार केली होती. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आपल्याला कायमच तोंडावर आपटवले अशी तीव्र नाराजी व्यक्त करत संजय जगताप यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर काँग्रेसला संघटनात्मक बांधणीची पुन्हा गरज आहे अशा शब्दात त्यांनी सल्ला देखील दिला. आता जगताप भाजपमध्ये जाणार असल्याने मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. तर शिवतारेंची अडचण वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट अंगावर घेणारे नेते अशी शिवतारेंची ओळख आहे. पण आता नेत्यांचे पक्ष प्रवेश घेत भाजपा २०२९ साली स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे का? असा सुरु राजकीय वर्तुळात उमटत आहे. सुरुवातीला जगताप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. कारण २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत संजय जगताप यांच्या विजयात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी म्हणजेच अजितदादांचा मोठा वाटा होता. पण २०२४ च्या जगताप यांच्या पराभव अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमुळेच झाला होता. कारण अजित पवार यांनी शरद पवार गटाचे संभाजीराव झेंडे यांना आपल्याकडे घेत उमेदवारी दिली होती. त्यामुळे मतविभाजन होऊन शिवतारे विजयी झाले. दुसरीकडे काँग्रेसमध्ये राहूनही संजय जगताप यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीकतेचे नाते आहे. त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे.

सासवड येथील पालखीतळावर उद्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांचे उपस्थितीत माजी आमदार संजय जगताप यांच्यासह कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.


