मुंबई दि २७(प्रतिनिधी) – पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर १० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकली आहे. आज राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.गोरेगावातील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती.
संजय राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला आहे. आज राऊत यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. संजय राऊत यांच्या वतीने न्यायालयात राऊत यांचा या प्रकरणात कोणताही सहभाग नसून त्यांना विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा करत जामीनाची मागणी करण्यात आली. तर ईडीकडून तेच या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असून त्यांना यातून लाभ झाला आहे. यातून आलेल्या पैशातूनच त्यांनी जमीन खरेदीबरोबर इतर व्यवहार केल्याचा दावा ईडीने केला आहे. या अगोदर २१ सप्टेंबरला सुनावणी झाली होती. पण आता ही सुनावणी १३ दिवस पुढे ढकलण्यात आली असून १० आॅक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे राऊतांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे.पत्राचाळ परिसरातील कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यात संजय राऊतही सहभागी असल्याचा आरोप आहे.