संजय राऊतांचा मास्टरस्ट्रोक, हक्कभंग समितीच्या अध्यक्षावरच घोटाळ्याचा आरोप
राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप, घोटाळ्याचे नेमके कनेक्शन काय
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित मोठा आरोप केला आहे. भाजपचे आमदार राहुल कूल यांच्या दौंडमधील भीमा साखर कारखान्यामध्ये ५०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी या पत्रामध्ये केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्यामुळे राऊत यांच्या विरोधात हक्कभंग कारवाईची मागणी केली होती. त्यावेळी संजय राऊत यांच्यावरील आरोपांची शहानिशा आणि पुढील कारवाई करण्यासाठी हक्कभंग समिती स्थापन केली होती. या समितीचे प्रमुखपद आमदार राहुल कुल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. हा भ्रष्टाचार नेमका कसा झाला, याचा घटनाक्रमही त्यांनी पत्रात लिहिला आहे. राऊत यांनी मोठी खेळत त्यांची चौकशी करणाऱ्या समितीच्या प्रमुखालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. राऊत यांनी ट्विट देखील केले आहे. “भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसते.५०० कोटीचा mony laundring व्यवहार आहे. निःपक्ष चौकशीची आपल्या कडून अपेक्षा आहे. असे राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. याप्रकरणात पीएमएलए कायद्यातंर्गत तातडीने ईडी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे राहुल कुल अडचणीत येण्याची शक्यता आहे. यावेळी राऊत यांनी भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सुत्रधार श्री. किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सहकारी कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. असे म्हणत टोला लगावला आहे. दरम्यान गंभीर आरोप असताना आता राहुल कुल हक्कभंग समितीच्या प्रमुखपदी राहू शकतात का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. भाजपाकडुन यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
प्रिय देवेंद्र जी
आपल्या माहितीसाठी भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ पाठवीत आहे..
Pmla कायद्याने कारवाई व्हावी असे घोटाळे संचालक मंडळाने केलें आहेत व राजकीय वरदहस्त लाभला असल्याने ते बिनधास्त आहेत.
शेतकऱ्यांच्या फसवणकीस सरकारी पाठींबा आहे का?कारवाई करा!@Dev_Fadnavis pic.twitter.com/AeiV3gjxaJ
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2023
राहुल कुल हे पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत. २०१९ मध्ये ते भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. तत्पूर्वी ते राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार होते. दरम्यान काल एका भ्रष्ट कारखान्याचं प्रकरण देवेंद्रजींकडं पाठवीत आहे, असे ट्विट राऊत यांनी केले होते.आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संजय राऊतांच्या आरोपांवर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.