Latest Marathi News
Ganesh J GIF

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांची हकालपट्टी

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा धक्का, शिवसेना ताब्यात आल्यानंतर शिंदे आक्रमक

दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन खासदार संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संसदीय नेतेपदी खासादर गजानन किर्तीकर  यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली आहे. राऊतांना पदावरुन हटवून एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिला आहे. याद्वारे पुन्हा एकदा शिंदेनी ठाकरेंची कोंडी केली आहे.

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे आता किर्तीकर संसदेत व्हीप काढु शकतात. संसदेत शिवसेनेच्या खासदारांचा विचार केला तर लोकसभेत एकूण १८ खासदारांपैकी शिंदेंच्या शिवसेनेसोबत १३ खासदार आहेत. तर ठाकरे गटासोबत ५ खासदार आहेत. राज्यसभेत एकूण ३ खासदार आहेत. तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत. एकनाथ शिंदे आपल्या पत्रात म्हणतात, “शिवसेना पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी झाली होती. ज्यात खासदार गजानन किर्तीकर यांना एकमताने संसदीय नेतेपदी निवडण्यात आले आहे.”, एकनाथ शिंदेंनी हे पत्र केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडेही सुपूर्द केले आहे. दरम्यान, या घोषणेनंतर शिवसेनेतील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देत सत्कारही केला. महिन्याभरापूर्वीच संसदेतील मुख्य नेते पदावरुन राऊतांना हटवण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. संसदेत व्हिप काढण्याचा अधिकार संजय राऊत यांना होता, पण आता गजानन किर्तीकर यांच्याकडे हे सर्व अधिकार असणार आहेत.यापूर्वी लोकसभेत शिवसेनेच्या मुख्य गटनेतेपदी संजय राऊत होते. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर संसदेतील शिवसेनेचं कार्यालय देखील एकनाथ शिंदे गटाला मिळालं होते.

आता शिवसेनेकडून किर्तीकर संसदेत व्हीप काढू शकतात. किर्तीकरांचा व्हीप संजय राऊत किंवा ठाकरे गटाच्या खासदारांनी पाळल्यास नकार दिल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई देखील होऊ शकते. अपात्रतेची कारवाई झाल्यास त्यांची खासदारकीही जाऊ शकते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!