शरद पवारांनी भाकरी फिरवली! सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्ष पदी निवड
राष्ट्रवादीच्या वर्धापणदिनी शरद पवारांची मोठी घोषणा, लोकसभेची तयारी सुरु, पटेलांनाही बढती
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा करत खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अधयक्षपदी निवड केली आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने भाकरी फिरवत फेरबदल केले आहेत.
शरद पवार यांनी २ मे रोजी पक्षातील अधयक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळीच सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष होणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण त्यावेळी ती करण्यात आली नव्हती. पण आता शरद पवार यांनी थेट दिल्लीतुन ही घोषणा केली आहे. सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, पंजाब व हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात व गोवा या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही घोषणा करत असताना सुळे दिल्लीत उपस्थित नव्हत्या. अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल ही नेते मंडळी दिल्ली येथे शरद पवारांसोबत उपस्थित होती. पक्षाकडून ही जबाबदारी दिल्यानंतर “राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.” अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.आहे. दरम्यान, अजित पवार यांच्यावर कोणतीच जबाबदारी सोपवली नसल्याने त्याची चर्चा सध्या रंगली आहे. आता अजित पवार यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाणार की अजित पवार नाराज होणार याची चर्चा रंगली आहे.
मुंबईत २ मे रोजी शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानं निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता.