शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला
शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष पदाची निर्मिती नाही, पवार निर्णय स्वीकारणार?
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यपदाचा दिलेला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या समितीने नामंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करताना अध्यक्षांच्या निवडीसाठी शरद पवार यांनी समितीची घोषणा केली होती. बैठकीमध्ये शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केला आहे.
देशाला, पक्षाला, राज्याला शरद पवार यांची गरज आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेत राष्ट्रवादी पक्षाच्या समितीने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केला आहे, अशी माहिती खासदार व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.पटेल म्हणाले, शरद पवार यांनी राजीनामा जाहीर करताना आम्हा कोणालाही विश्वासात घेतलं नाही. त्यांनी घोषणा केल्यानंतर आम्ही सर्व आवाक झालो. शरद पवार हे देशातले मोठे नेते आहेत. त्यांची देशाला, पक्षाला, राज्याला गरज आहे. त्यामुळे आज झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या समितीने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केला. आज झालेल्या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला. यामध्ये शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा एकमताने नामंजूर केला असून. त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहावे. शरद पवार यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भावनेचा विचार करून राजीनामा त्यांनी मागे घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, या ठरावासह राष्ट्रवादीची समिती शरद पवार यांना भेटणार असून त्यानंतर पवार आपला निर्णय जाहीर करतील. त्यामुळे अजून सस्पेन्स कायम आहे. पण या ठरावानंतर कार्यकर्ते आनंदी असुन त्यांनी जल्लोष केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी मुंबईतील कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यकर्ते चांगलेच भावनिक आणि आक्रमक झाले होते. यावेळी एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र शेजारील लोकांनी वेळीच त्याला अडवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.