Latest Marathi News
Ganesh J GIF

शरद पवारांचा बेळगावला जाण्याचा इशारा अन् सुप्रिया सुळेंची ती पोस्ट व्हायरल

इतिहासाचा दाखला देत सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला टोला, म्हणाल्या "सारच बदललंय...

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून राज्यात कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण तापले आहे. आज महाराष्ट्रातील काही वाहनांवर बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’च्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला इशारा देताना बेळगावला जाण्याचे सुतोवाच केले आहेत. पवारांनी हा इशारा दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची एक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.

महाराष्ट्र सीमेवरील परिस्थिती येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल.असा इशारा शरद पवारांनी दिल्यानंतर सुप्रिया सुळेंनी १९८६ च्या बेळगाव आंदोलनाच्या आठवणीची एक पोस्ट करत शरद पवारांनी पोलीसांच्या लाठ्या खाल्ल्या पण ते बेळगावला गेले असे सांगताना कर्नाटकला घाबरून दाैरा रद्द करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला टोला लगावला आहे.सुप्रिया सुळे म्हणतात, “कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय समितीने घेतला. खुद्द एस.एम. जोशी यांनी १९८६ मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं गेलं. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असं ठरलं. अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली. पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व शरद पवार यांच्याकडे होतं. बेळगावात दाखल होण्यासाठी त्यांनी एक शक्कल लढविली. ते कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली. सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. साहेबांनी स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली. खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवलं. तिघे जण निघाले. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली. परंतु त्यांना काहीच कळलं नाही. शरद पवार बेळगावात पोहोचले पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता. बेळगावात जमावबंदी होती. शरद पवार पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला. आंदोलनाची वेळ झाली. बरोबर ११ वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलीस गोंधळले. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. शरद पवार बाबासाहेब कुपेकर, आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली” अशी आठवण सुळे यांनी सांगितली आहे.

हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच ३६० अंशात बदललंय, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे. कारण महाराष्ट्र सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी बेळगावमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, कर्नाटक सरकारची परवानगी न मिळाल्याने हा दौरा स्थगित करण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!