
विधान परिषद निवडणूकीसाठी शिंदे, पवार गटाचे उमेदवार ठरले
उमेदवार देताना धक्कातंत्राचा वापर, महायुतीत नाराजीची चिन्हे, निवड बिनविरोध की निवडणुक?
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने चंद्रकांत रघूवंशी यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे.
विधान परिषदेचे पाच सदस्य विधानसभेवर निवडून आल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी महायुतीच्या पाचही उमेदवारांची घोषणा झाली आहे. संजय खाेडके हे आमदार सुलभा खोडके यांचे पती असून, अजित पवार यांचे निकटवर्ती आहेत. शिवसेनेचे विधान परीषद उमेदवार म्हणून धुळे-नंदुरबार जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून रविवार १६ मार्च रोजी तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामध्ये नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, माजी आमदार दादाराव केचे आणि प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांना संधी देण्यात आली आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजपसह महायुतीच्या सर्व जागा हमखास निवडून येतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत आहेत. महायुतीमध्ये भाजप 3 जागांवर लढणार असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना प्रत्येकी एक जागा सोडण्यात आली आहे. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान अनपेक्षित नावांना पसंती दिल्यामुळे अनेक नेते नाराज होण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेचे सदस्य असलेले आमश्या पाडवी, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या.