शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रीपदे आणि राज्यपाल पदाची लाॅटरी?
मंत्रिपदासाठी या खासदारांची नावे चर्चेत, भाजपाची यासाठी खेळी
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबच चर्चा सुरु असताना केंद्रीय मंत्रिमंडळातही लवकरच फेरबदल होणार आहेत. यावेळी शिंदे गटाला दोन मंत्रिपदं मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिंदे गटाला ताकत देण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे.
हिमाचल प्रदेश आणि गुजराज या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर केंद्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यात शिंदे गटाला केंद्रात 2 मंत्रिपदं दिली जाऊ शकतात. यामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळणार आहे. शिंदे गडाकडे १३ खासदार आहेत.मात्र आमदारांप्रमाणे केंद्रात नाराजीनाटय टाळण्यासाठी जेष्ठतेचा निकष ठरवला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार गजानन कीर्तिकर आणि हेमंत पाटील, प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय महिला म्हणून खासदार भावना गवळी यांचे देखील नाव आघाडीवर आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडे दोन राज्यपाल पदांची मागणी केली आहे. शिवसेनेते फूट पडल्यानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आलेल्या ज्येष्ठ नेत्यांना राज्यपालपदी नियुक्ती मिळावी म्हणून शिंदे गटाने राज्यपाल पदाची मागणी केली आहे. जर ती पदे मिळाली तर रामदास कदम यांची राज्यपाल पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मागणीवर लवकरच अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रात अडीच वर्षानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच का होईना पण शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद भेटणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेल्या खासदारांपैकी कुणाची लॉटरी लागते ते आता पाहणं महत्वाचं आहे. पण यामुळे उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिका निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.