शिवसेना ‘या’ नाव आणि चिन्हाने निवडणूक लढवणार
उद्धव ठाकरेंनी नावाबरोबर चिन्हाची केली घोषणा, निवडणूक आयोगाकडून मान्यता?
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- धनुष्यबाण चिन्हाबरोबरच शिवसेना हे नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर नक्की तुम्हाला काय हव आहे असा सवाल केला. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पर्यायी तीन नावं आणि तीन चिन्ह आयोगाला पाठवल्याचे सांगितले आहे.
ठाकरेंकडुन आयोगाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे अशी तीन नावे तर त्रिशुल, धगधगती मशाल आणि उगवता सूर्य ही आम्ही चिन्ह आम्ही निवडणूक आयोगाला पाठवली असल्याचे सांगितले आहे.शिंदे गटाची नावं अजून समोर आली नाहीत की त्यांनी दिली नाहीत, असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला. ठाकरेंनी यावेळी शिवसेनेच्या जन्माचा इतिहास सांगताना शिंदे गटाबरोबरच भाजपावर टिका केली. ते म्हणाल “काल निवडणूक आयोगानं जो निकाल दिला, शिवसेनेचे नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं,निकाल अनपेक्षित आहे. शिवसैनिकांच्या देव्हाऱ्यात धनुष्यबाण आहे. श्रीरामाचा धनुष्यबाण गोठवण्यात आला. ज्या शिवसेनेनं तुम्हाला जन्म दिला, त्या उलट्या काळजाच्या माणसांनी शिवसेना या आईच्या काळजात कट्यार घुसवलं. ४० डोक्यांच्या मागची महाशक्ती आनंदात असेल. शिवसेना हे पवित्र नाव गोठवलंत. मराठी माणासाची एकजूट गोठवली, हिंदू आहे सांगण्याची हिंमत नव्हतं, ते सांगणाऱ्या शिवसेनेचे नाव तुम्ही गोठवलंत असे म्हणत शिंदे गटाला तुम्हाला नक्की काय हवे आहे असा सवाल विचारला आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेवर बंदी घाला अशी मागणी इंदिरा गांधी यांच्याकडे केली होती. इंदिरा गांधी यांनी शिवसेनेवर बंदी घातली नव्हती. काँग्रेसनं जे केलं नाही ते तुम्ही करत आहात. शिवसैनिकांच्या मेहनतीवर, त्यांच्या घामामुळं तुम्ही मोठे झालात पण तीच तुम्ही मिटवायला जात आहात असे म्हणत भाजपवर देखील ठाकरेंनी टिका केली आहे.