
पाकिस्तानला धक्का, स्वतंत्र्य बलुचिस्तानची घोषणा
संयुक्त राष्ट्र संघाकडे पाठवला 'हा' प्रस्ताव, पाकिस्तानला गंभीर इशारा, अधिकृत झेंडाही फडकवला
दिल्ली – पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले असून युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पाकिस्तानला मोठा धक्का बसला असून पाकिस्तानमधील बलुचिस्तान भागाने वेगळे होत स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.
बलुच लेखक मीर यार बलोच यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत याबाबत घोषणा केली आहे. एवढेच नाहीतर या पोस्टमध्ये त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करताना संयुक्त राष्ट्रसंघाकडे मान्यता देण्याची मागणी केली आहे. तसेच नवी दिल्लीत बलुचिस्तानचा दुतावास सुरु करण्याची मागणी केली आहे. मीर यार बलोच यांनी एक्स वर पोस्ट केले की, “दहशतवादी पाकिस्तानचा नाश जवळ आला असल्याने लवकरच एक संभाव्य घोषणा अपेक्षित आहे. आम्ही आमचे स्वातंत्र्य घोषित केले आहे आणि आम्ही भारताला दिल्लीतील बलुचिस्तानचे अधिकृत कार्यालय आणि दूतावास सुरू करण्याची परवानगी देण्याची विनंती करतो. मीर बलोच यांनी संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहून बलुचिस्तानच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याची आणि या मान्यतेला पाठिंबा देण्यासाठी सर्व संयुक्त राष्ट्र सदस्यांची बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. तसेच बलुचिस्तानला नोटा छापण्यासाठी आणि पासपोर्ट छापण्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या बलुचिस्तानचा भूभाग सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने शांती सेना पाठवावी, अशी मागणीदेखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांनी सेना, फ्रंटियर कॉर्प्स, पोलिस, मिलिटरी इंटेलिजेंस, आयएसआय आणि नागरी प्रशासनातील सर्व बलुचिस्तान नसलेल्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब बलुचिस्तान सोडावे. बलुचिस्तानचे नियंत्रण लवकरच स्वतंत्र बलुचिस्तान राज्याच्या नवीन सरकारकडे सोपवले जाईल आणि लवकरच एक संक्रमणकालीन अंतरिम सरकारची घोषणा केली जाईल. असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान बलुचिस्तान हा अशांत प्रदेश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशात, राजकीय दुर्लक्ष, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि पाकिस्तानी राज्याकडून नैसर्गिक संसाधनांचे शोषण या कारणांमुळे फुटीरतावादी गटांनी दीर्घकाळापासून स्वातंत्र्याची मागणी होत होती.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असताना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या बंडखोरांची संघटना असलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांवर दोन वेगवेगळे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये १४ सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. आता बुलचिस्तान अधिकृतपणे वेगळे राष्ट्र होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.