
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि आणि पश्चिम बंगालमधील बहारामपूरचे खासदार युसूफ पठाण यांचे सासरे आणि मेहुण्याला मुंबईत पोलिसांनी अटक केली आहे. भायखळा परिसरात एका तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकांना मारहाण केल्याप्रकरणी युसूफ पठाणच्या सासऱ्यांना अटक करण्यात आली.शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास कारमधून पाणी उडाल्याच्या किरकोळ कारणावरून हा वाद निर्माण होता.

स्थानिक रहिवासी युसूफ खान हे गाडी चालवत घरी जात असताना, त्यांची गाडी एका खड्ड्यात आदळली आणि त्यातील पाणी शोएब खान याच्यावर उडालं. युसूफ खानने आपली गाडी थांबवून माफी मागितली होती, मात्र तरीही शोएबने त्याला शिवीगाळ केली आणि बांबूच्या काठीने गाडीची काच फोडून त्याला जखमी केलं.शनिवारी रात्री सुमारे 9 च्या सुमारास झालेल्या किरकोळ वादाचं हाणामारीत रूपांतर झाल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. युसूफ खानने असा दावा केला की, त्याने तात्काळ गाडी थांबवून शोएबची माफी मागितली. पण शोएब खानने त्याला शिवीगाळ केली, बांबूच्या काठीने त्याच्या गाडीची काच फोडली आणि त्याला मारहाण केली, असाही आरोप करण्यात आला. या वादानंतर युसूफ खान आपल्या कुटुंबीयांसह पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जात होते.

मात्र, वाटेतच युसूफ पठाण यांचे सासरे खालिद खान आले आणि तिथं पुन्हा एकदा वाद उफाळून आला. खालिद खान, त्यांचा मुलगा उमरशाद खान, शोएब खान आणि शहबाज पठाण या चौघांनी मिळून युसूफ खान आणि त्यांच्या नातेवाईकांवर बांबूच्या काठ्या आणि बेसबॉल बॅटने भीषण हल्ला केला.याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून भायखळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खालिद खान, उमरशाद खान आणि शोएब खान यांना अटक केली. मात्र, आरोपी शाहबाज पठाण अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आता न्यायालयाने त्यांना 2 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती समोर आली आहे.


