
धक्कादायक! पुण्यातील या भागात भररस्त्यात गोळीबार
पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा चव्हाट्यावर, या कारणामुळे गोळीबार, पोलिसांची कारवाई
पुणे दि २०(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. खून, गाड्यांची तोडफोड, कोयता गँग याचा त्रास पुणेकर सहन करत असताना, आता पुण्यातील बाणेरमध्ये भर रस्त्यात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून हा गोळीबार झाला असून यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
आकाश पोपट बाणेकर असं जखमीचं नाव आहे. याप्रकरणी निलेश दत्तात्रय पिंपळकर यांच्या तक्रारीवरुन चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य रणावरे आणि सागर बनसोडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि रोहित ननावरे हे दोघे बाणेर येथील एका मोटार कंपनीत कामाला आहेत. काही करणवारून कंपनीने रोहितला कामावरुन काढून टाकले़ होते. दरम्यान, फिर्यादी नीलेश यांच्यामुळे कामावरुन काढून टाकले असा समज रोहित याचा झाला. या गैरसमजुतीतून रोहितने जाब विचारण्यासाठी रोहितला रविवारी महाबळेश्वर हॉटेलजवळ बोलावून घेतले. यावेळी त्यांच्यात जोरदार वाद झाला. दरम्यान, रोहित ननावरे याच्या मित्रांनी त्याला शांत करत रोहितला घरी नेऊन सोडले. यावेळी फिर्यादी व आकाश बाणेकर हे तेथेच बोलत थांबले होते. यावेळी रोहितला सोडून आदित्य रणावरे, सागर बनसोडे तेथे आले़. त्यांनी पुन्हा त्यांच्याशी वाद घातला. यावेळी आदित्यने त्याच्या जवळील पिस्तुल काढत त्याच्यावर गोळीबार केला. ही गोळी आकाश बाणेकरच्या उजव्या पायांच्या मांडीला लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी कट्ट्याचा १ जिवंत राऊंड आणि २ केसेस जप्त केल्या आहेत. दरम्यान, पुणे पोलिसांनी कोयता गँगसह अनेक टोळ्यांवर कारवाई केली आहे. तसेच काही जणांना हद्दपार करण्याची कारवाई झाली. त्यानंतर चोरी, दोरोडे या घटनाही वाढत आहेत.
पुण्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. जुलै महिन्यात स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंदिर परिसरात एकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. तर मागील महिन्यात घोरपडी परिसरात गोळीबार झाला होता. त्यानंतर आता पुन्हा गोळीबार झाला आहे.